वटपोर्णिमा भाग-२
"महाराज, तुम्ही तर त्या हाडळीची मागणी एका क्षणात मान्य केलीत, तुम्ही तिच्या मागणीला एवढे महत्व कसे काय दिलेत?" यमदुताने आश्चर्याने यमराजास विचारले. यावर यमराज म्हणाले,
"अरे काय सांगु, एकदा या वटसावित्रीच्या प्रकरणापायी मी एका धर्मिक संकटात सापडलो होतो आणि तेव्हापासुनच हे वटपोर्णिमा व्रत चालु झालेलं आहे आणि हे व्रत करणार्या प्रत्येक स्त्रीला तिचे अखंड सौभाग्य आणि सात जन्म तोच पती देण्याचा आशिर्वाद मीच तर दिलेला आहे. मी तिची मागणी अमान्य करणे शक्यच नव्हते. त्यामुळे या विषयावर स्त्रियांशी वादविवाद घालण्याच्या भानगडीत मी पडत नाही विशेषकरुन प्रश्न जेव्हा त्यांच्या सौभाग्याचा असतो. तिला तिचे सौभाग्य द्यावेच लागणार. तिला तोच पती सात जन्मापर्यंत मिळणे अनिर्वार्य आहे. त्यामुळे आता तु तिच्या सोनुला उचलण्याची व्यवस्था कर आणि तिच्याजवळ आणुन सोड म्हणजे आपले काम झाले. मी माझ्या शब्दातुन मुक्त होईल"
"तुमची आज्ञा मी पाळणार नाही असे होऊच शकत नाही महाराज" असे बोलुन यमदुत त्याचे काम करण्यासाठी रवाना झाला. नेहाच्या सोनुला मनुष्यजन्मातुन मुक्त करण्याच्या तयारीला तो लागला होता. यमराजाच्या शब्दांनी नेहा खुश झाली होती. या पिशाच्च योनीतही तिला तोच पती मिळणार होता. कधी एकदाचा हा यमदुत सोनुला घेऊन येतोय असे तिला झाले होते. सोनु काय करत असेल? त्याच्या जेवणाचे कोण बघत असेल? त्याला तर मोजे आणि रुमाल सुद्धा सापडत नाहीत घरातले. कसे होत असेल सोनुचे देवजाणे...असे म्हणत ती वडाच्या फांदीवर बसुन पुन्हा पाय हलवु लागली. आता तिची नजर रस्त्यावरुन येणार्या जाणार्यांवर पडत होती. पायी चालणार्यंपेक्षा वाहनांचीच गर्दी जास्त दिसत होती. पाय हलवत असतानाच बसलेल्या अवस्थेत सेल्फी घेण्याची एक भन्नाट कल्पना तिच्या डोक्यात आली, पण एवढ्या काळ्या अंधारात सेल्फी कशी काय येणार? पारंब्यांना लटकलेल्या अवस्थेत सेल्फी घेण्याचा तिला मोह झाला होता. पण ... पण... आता ती मनुष्यजन्मातील नेहा राहीलेली नव्हती आणि तिच्याकडे आता मोबाईल तरी कुठे होता. ना मोबाईल, ना व्हाटसअप, ना फेसबुक ना इंस्टाग्राम. सोशल मिडीयाची तिला फार आठवण येऊ लागली. पण या पिशाच्च योनीत असले काहीही नव्हते. मनुष्यजन्मातील पुण्यकर्मांचे फळ म्हणुन तिच्या मागच्या स्मॄती अजुनही जागृत होत्या आणि पापकर्मांचे फळ म्हणुन ती पिशाच्च योनीत अडकली होती. फेसबुकचे होम पेज बघण्याचा तिला जाम मोह झाला होता. नथ आणि साडी घातलेला शेवटचा फोटो फेसबुकवर टाकला त्याला किती लाईक्स मिळाले असतील? कोणी काय काय कॉमेंट केले असतील? हे पाहण्याची तिला जाम ईच्छा झाली होती. कमीतकमी ते तरी पाहायला मिळायला हवे होते असे तिला वाटायला लागले.
झाले का जेवण? असल्या मेसेजचा खरंतर कंटाळा यायचा पण आता तोच प्रश्न मेसेजमध्ये कितीजणांनी पाठवला असेल हे बघण्याची तिला उत्सुकता लागली होती. अमक्या तमक्याने मला गुडमॉर्निंगच्या मेसेजमध्ये टॅग केले असेल का? रोज गुडमॉर्निंग पाठवणार्यांचे गुडमॉर्निंग आले असेल का? आणि हे सर्व नोटीफिकेशन्स बघण्याची आता तिला जाम उत्सुकता लागली होती. सुप्रियाने (नेहाची फेसबुक फ्रेंड) युरोपला पोचल्यावर आयफेल टॉवरबरोबरचे फोटो फेसबुकवर टाकले असतील का? खरंतर मी पण सोनुला घेऊन युरोपात जाणार होते, सगळ्या मैत्रिणींचे युरोपातले फोटो पाहुन पाहुन मला खुप हेवा वाटायचा. त्यांच्या नाकावर टिच्चुन जाणारच होते मी, पण ती ईच्छा सुद्धा अपुर्णच राहीली.
एकाच जागेवर बसुन तिला आता कंटाळा यायला लागला होता. उरफट्या पायांनी जमिनीवर व्यवस्थित चालता येईल की नाही याबाबत तिला शंका वाटत होती म्ह्णुन तिने हवेतल्या हवेत चालण्याचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य ती हवेमध्ये सहजपणे इकडुन तिकडे जाऊ शकत होती. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारातही ती आजुबाजुच्या हालचाली स्पष्टपणे पाहु शकत होती जणुकाही तिच्या डोळ्यातच प्रकाश दिला होता. अमावस्या आणि पोर्णिमेला जास्त शक्ती मिळतील हे सांगितलेले तिला आठवले. हाडळीचे ट्रेनिंग घेत असताना हे सांगण्यात आले होते. जसजशी आवश्यकता पडेल तसतशी एकेक शक्ती जागृत होत होती. या वडाच्या झाडावर आल्यापासुन तिने काहीही खाल्लेले नव्हते त्यामुळे आता तिला भुक लागत चाललेली होती. काय खावं आणि काय नाही हेच तिला कळत नव्हते. पलीकडे दुरवर कुठेतरी चायनिजचा गाडा लागलेला दिसत होता. ती तिकडे जायला निघाली परंतु लगेच पुन्हा वडाकडे खेचली गेली. तिला या क्षेत्राबाहेर जाण्यास परवानगी नव्हती. हा वड म्हणजे तिचा ईलाका होता. वरच्या दिशेला जाता येतेय का पाहण्यासाठी ती थोडीशी वर उडाली. वर जाण्यास तिला काहीही अडचण आली नाही. हवेत थोडीशी ऊंच गेल्यानंतर तिला त्या चायनिज पदार्थांचे गंध येऊ लागले आणि काय आश्चर्य त्या गंधानेच तिला तिचे पोट भरल्यासारखे वाटु लागले. ट्रेनिंगमधील हा एक महत्वाचा भाग. मनुष्यजन्माप्रमाणे कोणताही खाद्यपदार्थ स्पर्श करुन खाण्याची आवश्यकता नाही, खाद्यपदार्थाचा नुसता गंध भुक शमवण्यासाठी पुरेसा आहे. किती छान ! कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला की ती सोनुला चायनिज आणायला सांगत असे त्या चायनिज पदार्थांच्या वासाने तिला सोनुची अधिकच तीव्रतेने आठवण आली. वडापासुन नुसते थोडे वर आले की त्या चायनिज पदार्थांचा गंध येणार आणि गंध आला की झाले जेवण, किती मज्जा ना? भाजी आणा, दळण टाका, तयारी करा आणि कुकर लावा असली काहीही भानगड नाही.
थोड्यावेळाने वडाखाली एक कार येऊन थांबली. कॉल सेंटरचे काम उरकल्यानंतर श्रमपरीहार करण्यासाठी दोन मित्र तेथे आले होते. त्यांनी ग्लास आणि बाटली काढुन त्यांचा कार्यक्रम चालु केला आणि सोबतीला गाणीही लावली. विवीध भारतीवर बेला के फुल मध्ये "बेदर्दी बालमा तुझको" हे गाणे लागले होते. नेहाला खरंच तिच्या बालमाची आठवण येत होती. नेहाला त्या मद्याच्या वासानेही कसेतरी व्हायला लागले होते. त्यांना तेथुन हकलुनही लावता येत नव्हते. काय करावे तिला कळत नव्हते. अन तेवढ्यात तिची नजर डॅशबोर्डवर ठेवलेल्या मोबाईलवर गेली. अरे व्वा, आता मला यात माझे फेसबुक पाहता येईल. सर्व अपडेटस पाहायला मिळणार या कल्पनेनेच तिला खुप आनंद झाला. अलगद खाली येऊन तिने डॅशबोर्डवरील मोबाईलचा स्क्रीन चालु केला. पण तिला तो फोन उघडता येईना. पुन्हा लॉक करुन अनलॉक करण्याचा ती प्रयत्न करु लागली. दोघामधील एकाचे मोबाईलच्या बंद चालु होणार्या स्क्रीनकडे लक्ष गेले. तो दुसर्या मित्राला म्हणाला, "अरे तुझा फोन आपोआप बंद चालु कसा काय होतोय?" मेसेज येत असतील रे ..त्या व्हाटसअपने एक नको नको केलेले आहे असे म्हणत त्याने फोन हातात घेत अनलॉक केला आणि चेक केले तर स्क्रिनवर काहीच नव्हते. झाले असेल काहीतरी म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केले. अनलॉक झालेला फोन उचलुन पळुन जाण्याचा नेहाने प्रयत्न केला पण तो मोबाईल उचलल्या उचलल्या तिच्या हातातुन निसटुन पुन्हा डॅशबोर्डवर पडला.
मोबाईलची बंद चालु झालेली स्क्रिन आणि आता मोबाईल हवेत जाऊन पुन्हा डॅशबोर्डवर आदळलेला पाहुन एकजण चांगलाच घाबरला.. एकतर रात्रीचे बारा वाजत आलेले होते आणि त्यात अमावस्या. पण आजकाल कॅलेंडर कोण बघतो, त्यामुळे अमावस्या, पोर्णिमा, एकादशी कधी असतात हे शक्यतो कोणाला माहीतच नसते. काही नसते रे भुताटकी फिताटकी..दुसर्याने उसने अवसान आणत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. नेहाने ठरवले की आता मोबाईल उचलला की पडु द्यायचा नाही. मोबाईल अजुनही अनलॉक होता. तिने पुर्ण ताकदीनिशी मोबाईल उचलला आणि मोबाइल घेउन वडाच्या फांदीवर जाऊन बसली. या दोघांनी कारच्या डॅशबोर्डवरुन वडाच्या फांदीपर्यंत गेलेला मोबाईल पाहिला, हवेतल्या हवेत सर्व चालु होते. या दोघांची चांगलीच तंतरली. कोणाचीही तंतरेल... हवेतुन जाणारा मोबाईलच त्या दोघांना दिसत होता. त्या दोघांनी जीव मुठीत धरुन तिथुन जी धुम ठोकली ते त्यांनी मागे वळुनही पाहीले नाही.
दुसर्या दिवशी साऱ्या गावात बातमी पसरली वडावर भुताटकी आहे...
क्रमश:
- विजय वसवे
सन्नाटा
ReplyDelete