वटपोर्णिमा भाग-१

वटपोर्णिमा (भाग-१)

आज वटपोर्णिमा आणि सकाळपासुनच नेहाने वड पुजायला जाण्याचा हट्ट धरला होता. सोशल मिडीयावर आलेले वटपोर्णिमेविषयीची व्यंगचित्रे तसेच फालतु विनोद वगैरे तिने पुर्णपणे दुर्लक्षित केले होते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याला कोण काय करणार म्हणा? लग्नानंतर पहील्याच वर्षी सासुबाईंनी सोबत नेऊन तिला वडाची पुजा करण्याचा धडा दिला होता. तशी ती लहानपणापासुन आईचे वटपुजनही पाहत आलेली होतीच. सोनुने तिला खुप समजावले की अगं आज पाऊस आहे कशाला जातेस, नाही पुजला एखाद्या वर्षी वड तर काय फरक पडणार आहे. सोनु म्हणजे तिचा नवरा. लाडाने त्याला सोनु म्हणत असे. पण ऐकेल ती नेहा कसली? एवढ्या पावसातही ती गेलीच. ही तिची पाचवी वटपोर्णिमा. वड पुजल्यानंतर लगेच साडी आणि नथ घातलेला फोटो तिने येतायेता सोशल मिडीयावर अपलोड सुद्धा केला आणि ती मोपेडवर घरी जायला निघाली.

दुपार होत आली तरीही नेहा घरी आलेली नव्हती. यामुळे सोनुची चलबिचल वाढत चालली होती. तिचा फोनही लागत नव्हता. काय करावं? कुठे गेली असेल? कुठे शोधायला जावं? त्याला काहीच कळत नव्हते. वाट पाहण्या व्यतिरीक्त तो काहीही करु शकत नव्हता. शेवटी चार वाजता त्याचा मोबाईल वाजला, ओंकार हॉस्पीटलमधुन फोन आला होता. श्रीकांत पाटील का? हो मीच, बोला? तुम्ही लवकरात लवकर ओंकार हॉस्पीटलमध्ये या खुप अर्जंट आहे. श्रीकांत धापा टाकतच ओंकार हॉस्पीटलमध्ये पोचला. तेथील दृश्य पाहुन त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. एका दुर्दैवी अपघातात नेहा जागेवरच गेली असं त्याला सांगण्यात आलं. वटपुजा करुन परतत असताना ब्रेक नादुरुस्त झालेल्या एका डंपरने तिला उडवले होते. श्रीकांतचा विश्वासच बसत नव्हता. सांगत होतो जाऊ नको तरी माझे ऐकले नाही. होणा-या गोष्टी कोण टाळु शकले आहे का? कर्ता करविता परमेश्वर, आपल्या हातात काही नसते, रामनाम सत्य आहे असे म्हणत सर्वांनी त्याचे शांत्वन करण्याचा प्रयत्न केला. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणुन वटपोर्णिमेला वटपुजा करायला गेलेल्या नेहाचे आयुष्यच संपले होते. श्रीकांतचा संसार उद्ध्वस्त झाला होता.

त्याच वडाच्या आडव्या फांदीवर नेहा पाय हलवत बसलेली होती. पाय हलवता हलवता तिला स्वत:च्या पायाची बोटे पाहण्याची ईच्छा झाली परंतु बोटे काही दिसली नाहीत. कारण तिचे पाय मागच्या बाजुला वळालेले होते. आज अमावस्या होती. तिचा अपघात पोर्णिमेला झाला होता. १३ दिवसांचा पितृलोकातील प्रवास आणि २ दिवस हाडळीचे ट्रेनिंग घेतल्यानंतर आज ती त्याच वडाच्या झाडावर लटकली होती हाडळ म्हणुन. अमावस्येला आलेली हाडळ म्हणुन आजुबाजुच्या झाडांवरील जुनाट भुतांनी शुभशकुन सांगितला, "हजारात नाव काढणार आणि हाडळ जमातीचे नाव रोषण करणार" अशी भुतवाणी वर्तवली गेली. नेहाला काय चाललंय ते काहीच कळत नव्हते. झाडावरुन पडण्याच्या भितीने तिने हाताची नखे त्या फांदीभोवती घट्ट आवळली. तरीसुद्धा तिचा तोल गेला आणि ती फांदीवरुन घसरली. तिला वाटले ती पडणार पण तसे काहीही झाले नाही. ती हवेत तरंगली गेली. तिलाच आश्चर्य वाटले. तेवढ्यात एक यमदुताचे तेथे आगमन झाले आणि त्याने अधिकारवाणीने नेहाला सांगितले, "भुतयोनीत तुझे स्वागत आहे, अकस्मात झालेल्या तुझ्या अपघाती मृत्युमुळे तुला उर्वरीत आयुष्य या हाडळीच्या जन्मामध्ये काढावे लागणार आहे, काय करायचे, काय नाही करायचे हे तुला जसेजसे तु या भुतयोनीत जीवन व्यतित करशील तसे तुला आपोआप एकेक गोष्ट माहीत होत जाईल आणि शेवटचे आणि सर्वात महत्वाचे जेव्हा तु हरिनामाचा गजर ऐकशील तेव्हा तुझी या योनीतुन मुक्तता होईल"

नेहा भानावर आली, मागच्या जन्माच्या पुण्याकर्मांमुळे तिला थोडी स्मृती मिळालेली होती. तिला ती वटपौर्णिमा आठवली. तिचे व्रत आठवले. सात जन्मी हाच नवरा मिळण्याचे व्रत. यमराजानेच सावित्रीला दिलेला आशिर्वाद. ती तात्काळ त्या यमदुताला म्हणाली," ऐका, मी तर वटपौर्णिमेला सावित्रीचे व्रत करायला गेले होते, पण माझी काहीही चूक नसताना मला या भुतयोनीत जन्म मिळाला. पण माझे वटपोर्णिमेच्या व्रताचे फळ तरी मला मिळायलाच हवे"
"म्हणजे?"
मला या जन्मातही तोच नवरा मिळायला हवा. पुढचे सात जन्म तोच नवरा मिळण्यासाठी आम्ही स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पुजा करतो. हे ऐकुन यमदुत सुद्धा संभ्रमात पडला. तुमची मागणी रास्त आहे पण मला याविषयावर यमराजांशी बोलावे लागेल. एवढे बोलताच यमराजही तेथे हजर झाले. क्षणाचीही विलंब न करता यमराजाने तिची मागणी मान्य केली आणि त्या यमदुताला श्रीकांतला याच झाडावर घेऊन येण्याची आज्ञा दिली. सावित्रीने कसे पेचात पकडले होते हे यमराजाला लगेच आठवले तसा इथेही काही पंगा व्हायला नको म्हणुन तिच्या व्रताचे फळ तिला नक्कीच मिळेल असे सांगुन दोघेही तेथुन अंतर्धान पावले.
क्रमशः
विजय वसवे

Comments

  1. अरररर कड़क, भाऊ पुढचा भाग येऊ दे लवकर मीच वडाच्या झाडाला ताटकळत बसल्याचा फील नकोय, येऊ दे लवकर ��

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वटपोर्णिमा भाग-२